काँग्रेसला हवे चार दिवसाआड पाणी ! विभागीय आयुक्त केंद्रेकर यांना दिले निवेदन; आंदोलनाचा इशारा !

Foto

औरंगाबाद :  शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनला असून पाण्यासाठी रोज आंदोलने  होत आहेत.  या आंदोलनाचा भडका हिंसाचारात बदलण्याची शक्यता लक्षात घेता करीत शहर व जिल्हा काँग्रेसने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेत चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश मनपाला द्यावेत अशी मागणी केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर  शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.   महानगरपालिकेचे  नियोजन नसल्याने अख्खे शहर पाण्यासाठी तडफडत आहे. गेल्या महिनाभरापासून दररोज पाण्याच्या टाकीवर आंदोलने होत आहेत. पाण्याचे टॅंकर अडविले जात आहेत. अनेकदा टँकर चालकांना मारहाणीच्या घटना घडल्या. बळी तो कान पिळी या न्यायाने पाण्याची पळवापळवी होत आहे. 

शहरवासीयांना पाणीच मिळत नसल्याने शहराची परिस्थिती केव्हाही चिघळण्याची शक्यता असल्याची भीती काँग्रेसने  विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्या लक्षात आणून दिली.  मनपा  प्रशासन  शहराला पाणी पुरवण्यास असमर्थ आहे.  आठ ते दहा दिवसाआड पाणी दिले जाते.  शहराला किमान चार दिवसाआड पाणी पुरवावे नसता काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही काँग्रेसने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, शहर अध्यक्ष माजी आ.नामदेवराव पवार,  मा.आ.कल्याण काळे, गटनेते भाऊसाहेब जगताप, मिर हिदायत अली, संतोष भिंगारे, जितेंद्र देहाडे, डाॅ.पवन डोंगरे, ईब्राहिम पटेल, एकबालसिंग गिल, अब्दुल नवीद, शेख सोहेल, रमजानी खान, किशोर तुळशिबागवाले, निलेश भाग्यवंत, हिशाम ओसमानी, आमेर सलिम, मुझफर खान, गौरव जैस्वाल, बिबुराव कवसकर, सुभाष देवकर, मुख्तार भाई, सलिम भाई, हकीम पटेल, सलीम भाई यांच्यासह काँग्रेस मनपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.